कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की, सध्या पाऊस सुरू असून काहीवेळा अचानक तीव्र पाऊस पडत आहे. यामुळे ओढे-नाल्यांना पूर येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १९ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे
भवानीनगर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात १४ सप्टेंबर
रोजी रात्रीपासून सकाळपर्यंत सुमारे १२ तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सणसर येथील ओढ्याला पूर आला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि ओढ्यालगतच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सणसर येथे भेट दिली. त्यांनी कृषी आणि महसूल विभागाला नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांचे तातडीने पंचनामे करून शासनामार्फत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.
कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की, सध्या पाऊस सुरू असून काहीवेळा अचानक तीव्र पाऊस पडत आहे. यामुळे ओढे-नाल्यांना पूर येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १९ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. इंदापूर तालुक्यातील शेटफळघडे आणि परिसरात सुमारे १५६ मिलिमीटर (सहा इंच) पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. लाकडी नंबर येथील पाणी वाड्याकडे वाहत गेल्याने वाड्यांनाही पुराचा फटका बसला. शेतकऱ्यांचे ड्रीप सिंचनाचे साहित्य वाहून गेले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान झाले.
राज्यात ४१ लाख एकर शेतीचे नुकसान
राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये या पावसामुळे ४१ लाख ५७ हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये पशुधन, शेती आणि अनेक घरांचा समावेश आहे. भरणे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्तांना शासनामार्फत लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, भविष्यात अशा पूरस्थिती टाळण्यासाठी ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम दिवाळीनंतर जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
स्थानिक पातळीवर मदतकार्य
पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून भवानीनगर येथील हॉटेल अलंकारचे मालक सोनू नेवसे यांनी ओढ्यालगतच्या नागरिकांना सांबर-भात वाटप करून मानवतेचे दर्शन घडवले. ग्रामस्थांनी सणसर ओढ्याच्या वारंवारच्या पुरामुळे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुचवले की, ओढ्याच्या उगमापासून ते सोनगाव येथे नदीला मिळण्यापर्यंत सर्वेक्षण करून अरुंद भाग रुंद करावेत आणि अतिक्रमणे हटवावीत. तसेच, ओढ्यालगतच्या घरांचे इतरत्र स्थलांतर करावे, जेणेकरून भविष्यात अशा आपत्ती टाळता येतील आणि नागरिकांना सुरक्षित जीवन जगता येईल.























