दसऱ्यानिमित्त पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात – पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांचा उपक्रम
सोलापूर/पंढरपूर :
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांच्या वतीने दसऱ्याच्या सणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंच्या 2000 किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पूरग्रस्त बांधवांचा दसरा गोड झाला, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी आबा काळे म्हणाले, “महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, अहिल्या नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. धन-धान्य, पशुधन व घरगुती सामानाची अपरिमित हानी झाली आहे. अशा प्रसंगी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी पुढे यायला हवे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पूरस्थितीमुळे बाधित कुटुंबांना चादरी, बेडशीट, धान्य, कपडे, शालेय साहित्य, मसाले, किराणा यांसारख्या वस्तूंची तातडीने गरज आहे. नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार या मदतीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील मुंगशी, नाडी, कुर्डुवाडी, आष्टी तसेच पुणे जिल्ह्यातील थेऊर भागातील नागरिकांना या मदत किटचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते रोहन बारस्कर, त्यांचे सहकारी बापू सोनवणे, प्रशांत कल्याणकर व त्यांचे सहकारी यांनी मोलाची साथ दिली.




















