नगरसेवकांचा मोठा विकास आंबील ओढ कॉलनी झाली भकास
पुणे मनपा सेवकांच्या घराला आग; तीन नगरसेवक असूनही कॉलनीची दुरवस्था कायम
दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च दाखवूनही मनपा वसाहतीची अवस्था जैसे थे; सागर धाडवे यांचा प्रशासनावर निशाणा
पुणे: आंबील ओढा कॉलनी–सानेगुरुजी नगर येथील पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत आज सकाळी मीटर रूमला भीषण आग लागली. याआधीही याच कॉलनीमध्ये अशाच प्रकारच्या तीन दुर्घटना घडल्या असूनही मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशी झालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या या दुर्घटनांकडे प्रशासनाने जणू पूर्ण पणे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप होत आहेत.
स्थानिक रहिवाशांच्या मते, आग विझविण्यात विलंब झाला आणि सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, ही घटना किती गंभीर असूनही मनपा अधिकाऱ्यांना याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे.
सत्ताधारी भाजपचे तीन नगरसेवक वास्तव्यास; तरीही कॉलनीची बिकट अवस्था
सदर मनपा वसाहतीत सत्ताधारी भाजपचे तीन नगरसेवक राहत असून, कॉलनीतील ढासळलेल्या इमारती, असुरक्षित विद्युतजाळे, आणि दुरुस्ती-अभावाची स्थिती पाहता प्रशासन व नगरसेवकांच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.
रहिवाशांचे म्हणणे आहे की, वसाहतीतील समस्या वर्षानुवर्षे न सुटल्याने प्रशासन अक्षरशः ‘हात टेकलेले’ दिसते.
“कोटी कोटींचे टेंडर कुठे जातात?” — सागर धाडवे
युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
धाडवे म्हणाले,
“मनपा वसाहतींच्या दुरुस्ती–देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. पण प्रत्यक्षात वसाहतींची अवस्था जैसे थे आहे. मग एवढा निधी जातो तरी कुठे? ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे.”
ते पुढे म्हणाले की, आग लागण्याच्या तीन आधीच्या घटनांवरही कोणताही पंचनामा, चौकशी किंवा जबाबदारांवर कारवाई झाली नाही — हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण आहे.
कॉलनीला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जाते का?
कर्मचारी पुणे शहराची सेवा बजावतात, पण त्यांच्या राहत्या घरांची अवस्था प्रशासन जाणीवपूर्वक दुरावस्थेत ठेवत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
वीज धोक्यांचे व्यवस्थापन नाही, दुरुस्तीचे काम नाही, सुरक्षा उपाय नाही एवढा निष्काळजीपणा कसला?
युवक काँग्रेसने या प्रकरणाची तत्काळ चौकशी, आगीचा पंचनामा, तसेच दुरुस्ती कामातील भ्रष्टाचाराची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे.
धाडवे यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
आपला
सागर धाडवे 9762792769
युवक काँग्रेस सरचिटणीस.























