कोलवडी-साष्टे येथे मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
थेऊर प्रतिनिधी
कोलवडी-साष्टे (ता. हवेली) येथे थेऊर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये तब्बल १३६० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान ९३० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७३० नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ७० रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया आगामी काही दिवसांत करण्यात येणार आहेत.
शिबिरात हृदय तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब, तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध तपासण्यांचा समावेश होता. याशिवाय हात व पायांच्या मोफत कृत्रिम अवयवांसाठी नोंदणी देखील करण्यात आली.
या महाआरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आवश्यक तपासण्या व उपचार विनामूल्य मिळाले असून उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.























