विश्वशांतीनिकेतनमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा या विषयावर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
चाकण प्रतिनिधी
दि. 3 जानेवारी 2026
विश्वशांतीनिकेतन विद्यालय गुरुकुल यांचा 7वे वार्षिक स्नेहसंमेलन “महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वारकरी संप्रदाय” या विषयावर आधारित अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे संपन्न झाले. खेड पंचायत समितीचे मा. उपसभापती हभप श्री. अमृत नाना शेवकरी हे या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. खूप मोठा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवात, प्रत्येक संतांची शिकवण, त्यांचे जीवन कार्य आणि त्यांनी लिहिलेले अभंग, भजन त्यावर आधारित विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केले. यामध्ये प्रत्येक संतांची माहिती, संतांची वेशभूषा, जिवंत देखावे स्वरूपात दाखविण्यात आले. वारकरी संप्रदायाचा पाया ते कळस याची सविस्तरपणे माहिती सांगून सर्व संतांचे भजन सादर केले. असे सर्व भजनांची आखणी करण्यात आलेली आहे. विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा मध्ये आणि प्रत्येक संतांच्या वेशभूषा मध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या दिवशी भागवत एकादशी होती. याचे औचित्य साधून विश्वशांतीनिकेतन विद्यालय गुरुकुल यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नेत्र दीपक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षिकांनी यासाठी खूप मेहनत घेतली. विद्यालयाचे डायरेक्टर डॉ. प्रविण आघाव यांच्या संकल्पनेतून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांनी दिली आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालन मोहिनी सूर्यवंशी आणि स्वाती ढबाले यांनी केले. आभार प्रदर्शन अर्चना आघाव यांनी केले.















