रेहकुरी गावात अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी
रेहकुरी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
जुन्या राहण्याच्या जागेवरून सुरु असलेल्या वादातून अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रेहकुरी परिसरात घडला आहे. या प्रकरणी गोकुळ कैलास मांडगे, योगीता कैलास मांडगे आणि साखरबाई तात्याबा मांडगे (सर्व रा. रेहकुरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रेहकुरी येथील अंगणवाडी सेविका आहेत. दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता, त्या अंगणवाडीच्या दिशेने जात असताना गावातील आरोपी गोकुळ मांडगे हा रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी जुन्या राहण्याच्या जागेवरील वादावरून त्याने फिर्यादी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ सुरू केली.
फिर्यादी यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी गोकुळ याची पत्नी योगीता मांडगे आणि आई साखरबाई मांडगे या दोघींनीही त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर गोकुळ मांडगे याने संतापाच्या भरात “जर तू पुन्हा त्या जागेवर हक्क सांगितलास तर तुला गाडीखाली घालून जिवे मारून टाकीन” अशी उघड धमकी दिली.
या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. फिर्यादी चंदा यांचा जबाब नोंदवून तीघांविरुद्ध शिवीगाळ, दमदाटी आणि जीव घेण्याची धमकी या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, फिर्यादी व आरोपी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून जागेसंबंधी वाद सुरू असून, त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
एका सेविकेला अशा प्रकारे धमकी देणे हे अत्यंत निंदनीय असल्याची भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली आहे.























